नमस्कार मित्रांनो,
परवा माझ्या शाळेत पेंटिंग चे काम सुरू होते. शाळेची नवीन इमारत असल्यामुळे संपूर्ण इमारतीला विविध चित्रांच्या माध्यमातून बोलकी आणि विद्यार्थ्यांना आवडेल अशा पद्धतीने फुलवण्याचे काम आम्ही गावातील मंडळीच्या सहकार्याने करत होतो. सर्वप्रथम शाळेच्या व्हरांड्यामध्ये विविध विषयांची व विविध प्रकारची चित्रे काढून पूर्ण झाली. विविध नकाशे, मराठी आणि इंग्रजी ची विविध प्रकारची माहिती, विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे सामान्य ज्ञानाचे विविध घटक आणि कितीतरी प्रकारची बरीच चित्रे पूर्ण केल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की, आपण शाळेच्या एका चित्रात विद्यार्थ्यांनी अगदी बालवयात म्हणजेच शालेय जीवनातच वाचली पाहिजेत अशा काही महत्वाच्या पुस्तकांची यादी करून जर एका चित्रात लिहिली तर त्यांना जीवनभर आवश्यक असलेले ज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेले कौशल्य किंवा संस्कार अगदी सहजपणे मिळून जातील. एकतर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी हवी ती पुस्तके मिळत नाहीत किंवा त्यांना वाचनाची आवड असली तरी महत्त्वाच्या आणि प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची नावे त्यांना माहिती नसतात. मग यावर विचार करून आम्ही असे ठरवले की, जर विद्यार्थ्यांसमोर नेहमी राहतील अशा पद्धतीने दहा वीस पुस्तकांची नावे एखाद्या चित्रात लिहिली तर अगदी बालपणातच पाहून पाहून त्यांना त्या पुस्तकांची नावे पाठ होऊन जातील आणि भविष्यात वेळ मिळाल्यानंतर अगदी आवर्जून ते ही पुस्तके नक्कीच वाचायचा प्रयत्न करतील कारण आम्ही या चित्राला नावच असे दिले की काही झाले तरी विद्यार्थ्यांना ही पुस्तके वाचण्याची ओढ मनात सदैव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर काय होते मग या चित्राचे हेडिंग किंवा मथळा ...तर तो होता...
'विद्यार्थ्यांनी वाचण्यासारखी पुस्तके
'.... मग आम्ही कोणत्या पुस्तकांची नावे या चित्रात लिहिली आणि त्या पुस्तकांचे लेखक कोण होते याबद्दल चला जाणून घेऊया अगदी थोडक्यात... तुम्हालाही आवडले तर ही पुस्तके नक्की वाचा आणि तुमच्या किशोरवयीन मुलांना ही पुस्तके नक्की वाचायला द्या... आणि हो बरं का ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे मात्र नक्की कमेंट करून कळवा.... चला तर मग आम्ही लिहिलेल्या पुस्तकांची नावे आणि त्यांची थोडक्यात माहिती घेऊया.....
1) यश तुमच्या हातात :
मित्रांनो मला अतिशयआवडलेले असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक शिव खेरा हे आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचले त्यावेळेस माझ्यात झालेला बदल केवळ शब्दात व्यक्त करणे माझ्यासाठी अशक्य आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर आपल्या अंतर्मनात होत जाणारा बदल अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला जाणवू लागतो. मला तर वाटते अगदी पाचवी सहावीत असतानाच प्रत्येक विद्यार्थ्याला हे पुस्तक वाचायला दिले गेले पाहिजे. या पुस्तकातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारे संस्कार अगदी बालवयातच विकसित होण्यासाठी खूप खूप मदत होते. मला आताही आठवते, मी माझ्या कित्येक विद्यार्थ्यांना हे पुस्तक भेट म्हणून दिलेले आहे. सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि धैर्य यांचा विकास होण्यासाठी या पुस्तकाला तोडच नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या मदतीने श्री शिव खेरा सरांनी जे पाठ या पुस्तकात लिहिले आहेत ते आपल्या आंतर मनावर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करतात. या पुस्तकातील सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनामुळे जीवनावर होणारे परिणाम जर आपण काळजीपूर्वक वाचले तर आपण आयुष्यात अपयशापासून हजारो कोस दूर राहू शकतो याची मला खात्री वाटते. मला वाटते प्रत्येकाने अगदी आवर्जून हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
2) रिच डॅड पुअर डॅड :
रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेले हे एक अप्रतिम असे पुस्तक आहे. त्यांनी या पुस्तकातून आर्थिक श्रीमंती कशा पद्धतीने अगदी सहजपणे मिळवता येते हे सिद्ध करून दाखवले आहे. आपणा सर्वांना श्रीमंत व्हावे असे वाटते पण पैसे सहजपणे अगदी कशा पद्धतीने कमवता येतात याचे पूर्ण स्पष्टीकरण त्यांनी या पुस्तकात दिलेले आहे. मला वाटते अठरा वर्षे पूर्ण झालेल्या आणि भविष्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक युवकांच्या हातात हे पुस्तक पडलेच पाहिजे. ज्यांनी नुकतीच कमाई करायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अगदी सोनेरी सुरुवात म्हणायला हरकत नाही. हे पुस्तक मराठी भाषेतही उपलब्ध आहे. पैसे आपल्यासाठी कसे काम करतात आणि आपल्याला अजून श्रीमंत कसे बनवतात हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक एकदा नक्की वाचावे...
3) राजमुद्रा :
मनोहर भोळे या लेखकाने लिहिलेले हे एक अतिशय सुंदर असे पुस्तक आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी व्हायची इच्छा असलेल्या मुलांसाठी तर हे पुस्तक म्हणजे एक खूप मोठे मार्गदर्शकच. या पुस्तकात लेखकाने अतिशय जिद्द आणि मेहनत घेऊन कठीण परिस्थितीचा सामना करत मोठे मोठे अधिकारी बनलेल्या बारा यशस्वी अधिकाऱ्यांची
माहिती आणि जीनवप्रवास अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत वर्णन केलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील अतिशय ग्रामीण भागातील पांडुरंग पोले नावाचा एक विद्यार्थी कशा पद्धतीने अतिशय विपरीत परिस्थितीत अभ्यास करून आय. ए. एस. अधिकारी बनतो ही माहिती वाचल्यानंतर आपल्याला जी प्रेरणा मिळते ती अद्भूतच म्हणावी लागेल.... चला तर मग एकदा हे पुस्तक वाचून काढा.
4) Think And Grow Rich:
विचार करा आणि श्रीमंत व्हा. हे पुस्तक मराठीसह कितीतरी भाषेमध्ये उपलब्ध आहे. नेपोलियन हिल या महान लेखकांने लिहिलेले हे पुस्तक गेल्या कित्येक वर्षापासून बेस्ट सेलर पुस्तक बनलेले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आयुष्यातील सुरुवातीची सोळा वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. या सोळा वर्षात मुलांवर अतिशय उच्च दर्जाचे संस्कार केले तर त्यांचे संपूर्ण जीवनच अतिशय आनंदी, प्रसन्न, समृद्ध आणि यशस्वी बनुन जाते. या पुस्तकातून नेपोलियन हिल यांनी नेमकी हीच गोष्ट अगदी स्पष्टपणे वर्णन करून सांगितलेली आहे. नेपोलियन हिल यांनी 500 यशस्वी व्यक्तींचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर त्या सर्वांमध्ये यश मिळवून देणारी नेमकी कोणती गोष्ट होती आणि तिने त्यांना कसे यशस्वी बनवले हे अगदी सोप्या भाषेत प्रभावीपणे मांडलेले आहे. आपल्याला आपलीही मुले यशस्वी आणि कर्तत्ववान व्हावी असे जर वाटत असेल तर त्यांच्या हातात हे पुस्तक द्यायला नको का...?
5) आमचा बाप अन आम्ही:
डाॅ नरेंद्र जाधव यांचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून आपल्या मनाचा कणखरपणा हजारो पटींनी वाढलाच म्हणून समजा. शिक्षणाचा आपल्या जीवनावर किती सकारात्मक परिणाम होतो आणि आपले जीवन कशा पद्धतीने झपाट्याने बदलून जाते याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळते. लेखकाने या पुस्तकातून केलेले वडिलांचे वर्णन आणि त्यांची शिकवण आपल्यासाठी कायम स्वरूपाची प्रेरणा बनून राहते. अगदी शून्यापासून सुरुवात झालेला जीवनाचा प्रवास आणि त्यांच्या कुटुंबातील भावंडांनी मिळवलेले डोळे दिपवून टाकणारे यश पहिले की, शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे हे शब्द अगदी खरे वाटल्याशिवाय राहत नाहीत बरं का.
6) विद्रोही तुकाराम :
डाॅ. आ.ह. साळुंखे सर यांच्या पुस्तकांपैकी हे एक अतिशय अप्रतिम पुस्तक आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विषयी अगदी सखोल आणि अभ्यासपूर्ण अशी माहिती या पुस्तकातून आपणाला वाचण्यास मिळते. संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण जीवन चरित्र आणि जीवन कार्य या पुस्तकातून अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटलेले आहे. संत तुकाराम महाराज यांच्याविषयीचे हे पुस्तक वाचून मला तरी वाटते खरी श्रद्धा आणि आस्था कशी असावी हे या पुस्तकातून अगदी अप्रतिमपणे वर्णन केलेले आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट रूढी परंपरा आणि लोकजीवनातील सामाजिक भेदभाव नष्ट करून विज्ञानवादी आणि डोळस जीवन जगण्यासाठी जीवनभर पुरेल असे मार्गदर्शन आपल्याला या पुस्तकातून नक्कीच मिळू शकते.
7) शिवाजी कोण होता ? :
काॅ. गोविंद पानसरे सरांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचेवरील हे एक अतिशय सुंदर असे छोटेखानी पुस्तक आहे. मी आत्तापर्यंत शिवाजी महाराजांबद्दल जेवढे काही वेगवेगळी पुस्तके वाचली त्यापेक्षा हे अगदी आगळेवेगळे पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराज अगदी कमी वेळात जर समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक एक सर्वोत्तम पर्याय आहे. एक आदर्श राजा कसा असतो हे आपल्याला या पुस्तकातून अतिशय सुरेख पद्धतीने स्पष्ट केलेले आहे.
8) स्टीलफ्रेम:
खूप खूप शिकून खूप खूप मोठे होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी हे पुस्तक कायम आपल्या जवळ ठेवावे असेच आहे. हे पुस्तक वाचताना जर आपले वय 30 पेक्षा कमी असेल तर आपल्याला नक्कीच वाटते की ,आपण एकदा तरी स्पर्धा परीक्षा देऊन खूप मोठा अधिकारी झाले पाहिजे आणि हे पुस्तक वाचताना जर आपले वय चाळीसच्या घरात असेल तर मात्र नक्कीच पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. मनात एक खंत रेंगाळत राहते की, अरेरे.. हे पुस्तक जर मी अगोदरच वाचले असते तर माझ्या मध्ये लपलेला अधिकारी कधीच बाहेर आला असता आणि आज लाल गाडीच्या दिव्यात बसून मी ऐटीत देशसेवा करत फिरत राहिलो असतो. या पुस्तकाचे लेखक फारूक नाईकवाडे हे आहेत.
_________________________________________________
मित्रांनो, अज्ञान हे कधीही भयंकरच असते त्यामुळे अगदी बालवयापासून मुलांच्या मनावर योग्य आचार विचारांचे संस्कार जर रुजवले तर भविष्यात निर्माण होणाऱ्या अपरिमित हानी पासून आपण त्यांचे निश्चितच रक्षण करू शकतो....धन्यवाद.